- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन..
- आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा..
- महिन्याभरात मंत्रिमंडळात अंतिम निर्णय अपेक्षित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २३ जून २०२६) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय, परेड ग्राऊंड आणि इतर अनुषंगिक कार्यालयांसाठी ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या ताब्यातील २० हेक्टर जमीन हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, याबाबतचा अंतिम निर्णय येत्या महिनाभरात मंत्रिमंडळात होण्याची शक्यता आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात सकारात्मक आश्वासन दिले आहे.
शहराच्या वाढत्या लोकसंख्या आणि विस्तारामुळे अत्याधुनिक व स्वतंत्र पोलीस मुख्यालयाची आवश्यकता अनेक वर्षांपासून व्यक्त होत होती. या मागणीसाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांनंतर ताथवडे येथील वळुभाटा प्रक्षेत्रातील ६७.९४ हेक्टर क्षेत्रापैकी २० हेक्टर जमीन पोलीस आयुक्तालयासाठी हस्तांतरित करण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे.
महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रस्तावाचा आढावा घेण्यात आला. लवकरच शासन निर्णय जारी होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे पोलीस प्रशासनाला आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध होऊन शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होणार असल्याचा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.


















