- दुचाकीस्वाराची वाहतूक पोलीसाला धमकी; आरोपी अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ ऑक्टोबर २०२०) : रविवारी दुपारी नाशिक फाटा येथे वाहतूक नियोजन सुरु असताना नाशिक फाट्याकडून भोसरीकडे जाणाऱ्या मार्गावरून आरोपी त्याच्या दुचाकीवरून (एम एच १२ एफ जे ६३७०) विरुद्ध दिशेने आला. त्यामुळे वाहतूक पोलीस नागरे यांनी त्याला अडवून विरुद्ध दिशेने येण्याचे कारण विचारले. विरुद्ध दिशेने येण्याचे कारण न सांगता आरोपीने पोलीस हवालदार नागरे यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
‘मी तुमच्या सारख्या पोलिसांना कोलतो. तू कोण मला अडवणारा व विचारणारा. मी इथला दादा आहे. माझे कोणीही काहीही वाकडे करु शकणार नाही. तुला काय तक्रार द्यायची ती दे. मी दोन दिवसात जेलमधुन बाहेर येईन, पण बाहेर आल्यावर तुझी गेम करुन टाकीन.’ अशी धमकी आरोपीने पोलीस हवालदार नागरे यांना दिली. ही घटना जे आर डी टाटा उड्डाणपुल, नाशिक फाटा येथे रविवारी (दि. २६) दुपारी पाच वाजता घडली.
गणेश संभाजी चव्हाण (वय २८, रा. विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार विष्णू तुकाराम नागरे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घालून वाहतूक पोलीस करत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला. तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबाबत गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.