न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २० डिसें.) :- पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील १ जानेवारी २०१९ ला राज्यातील अनेक भागातील नागरिक लाखोंच्या संख्येने अभिवादन करण्यास येणार आहेत.
गतवर्षीची घटना लक्षात घेता २५ डिसेंबर २०१८ ते ५ जानेवारी २०१९ पर्यंत संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना पाच जिल्ह्यातून तडीपार करावे आणि त्यांना नजरकैदेत ठेवण्यात यावे, अशी मागणी भीम आर्मी संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष दत्ता पोळ यांनी केली आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही मागणी केली.
गतवर्षी भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी दरम्यान घडलेल्या दंगली प्रकरणी मिलिंद एकबोटे, मनोहर एकबोटे यांच्यावर सरकार कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही, असा आरोप दत्ता पोळ यांनी यावेळी केला.