न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. २० डिसें.) :- रहाटणीमधील नखातेनगर परिसरातील जनता स्टील सेंटरमध्ये अनधिकृतपणे घरगुती सिलेंडर रिफिलिंग करून त्याची विक्री करीत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. गुरुवार (दि. २०) रोजी दुपारी बाराच्या सुमारास या दुकानावर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून त्यात ३६ सिलेंडर जप्त केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी बाराच्या सुमारास जनता स्टील सेंटर या भांडे विक्री करणाऱ्या दुकानात विविध कंपन्यांचे घरगुती सिलेंडरचा काळाबाजार करून ते ग्राहकांना विकण्याचा व्यवसाय करीत होते. यात विविध कंपनीचे भरलेले सिलेंडर यावेळी आढळून आले. यात हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपनीचे दोन सिलेंडर भारत पेट्रोलियमचे चार सिलेंडर खाजगी कंपनीचा एक सिलेंडर तसेच भारत पेट्रोलियमचे चार किलोचे नऊ सिलेंडर यावेळी आढळून आले.
नायब तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मुद्देमाल महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन, त्याचा पंचनामा करून, वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.












