- रुग्णाच्या नातेवाईकांना कायदा हातात न घेण्याचे पोलिसांचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२१) :- कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नातेवाईक आणि डॉक्टरांमध्ये वाद होत आहेत. परिणामी शहरातील बहुतांश रुग्णालय परिसरात तणाव असल्याचे दिसून येते. या सर्व बाबींचा विचार करून रुग्णालय परिसरात पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
पिंपरी- चिंचवड शहरात दररोज अडीच ते तीन हजार जणांना कोरोनाची बाधा होत आहे. पन्नास ते साठ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू होत आहे. रुग्णांचा जीव चवण्यासाठी डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. मात्र, काही नातेवाईक आणि डॉक्टरामध्ये वादावादी होत आहे. एकंदरीतच रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक व्यवस्थेवरील राग डॉक्टरांवर काढत असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहेत.
शहरातील वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पोलिस प्रशासन जिवाची पराकाष्ठा करीत आहे. रुग्णालयात होणाऱ्या वादाचा मुद्दा लक्षात घेता पोलिसांचे मनुष्यबळ कमी पडू लागले आहे. त्यामुळे गुन्हे शाखेची पथकेही बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहेत. यामध्ये गुन्हे शाखा युनिट एक ते पाच, दरोडाविरोधी पथक, खंडणीविरोधी पथक, गुंडा स्कॉड, सायबर सेल, अंमली पदार्थविरोधी पथक यांचे प्रत्येकी एक अधिकारी आणि पाच कर्मचारी दिवस आणि रात्र पाळीत तैनात असणार आहेत. एखाद्या डॉक्टरबाबत काही तक्रार असल्यास पोलिसांना याबाबत माहिती द्यावी. मात्र, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, असे रामनाथ पोकळे, अपर पोलिस आयुक्त, पिंपरी – चिंचवड यांनी आवाहन केले आहे.