- बंद शाळांमध्ये कॅमेरे बसवण्याचा अट्टाहास कशासाठी?..
- ‘सीसीटीव्ही’च्या कामात कोट्यवधींची अफरातफर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२१) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेत आमदार आणि अधिकारी यांचा मनमानी कारभार सुरू आहे. आमदाराच्या मेव्हण्याचा लाड पुरवण्यासाठी माध्यमिक शाळेत ‘सीसीटीव्ही’ बसवण्यात येत आहेत. कोविड १९ प्रादुर्भावामुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार माध्यमिक शाळा गेल्या वर्षभरापासून बंद असताना या बंद शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे काम आमदाराचा मेव्हणा असलेल्या ठेकेदाराला देण्यात आले आहे. आमदाराचे नाव वापरून अशा कामांच्या माध्यमातून अधिकारी आणि ठेकेदारांकडून कोट्यवधी रुपये लुटण्याचा घाट घातला जात आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिकेच्या एकूण १८ माध्यमिक शाळा आहेत. मार्च २०२० मध्ये देशात कोरोना विषाणुचा फैलाव सुरू झाला. कोविड १९ च्या भयंकर परिस्थितीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले, अनेकांच्या नोक-या गेल्या, व्यवसाय ठप्प झाले, कंपन्या बंद पडल्या, मोलमजुरी करणारा कामगार वर्ग एकवेळच्या अन्नाला महाग झाला. अशा भीषण परिस्थितीमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत ठेकेदार आणि अधिकारी यांच्याकडून जोरात लुटमार केली जात आहे. शहरातील माध्यमिक शाळा मार्च २०२० पासून बंद आहेत. विद्यार्थी घरातूनच ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. असे असताना या शाळांच्या वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम काढण्यात आले आहे. हे काम एका ठेकेदाराला देण्यात आले आहेत. हा ठेकेदार आमदाराचा मेव्हणा असल्याची माहिती समोर आली आहे. मेव्हण्याचा लाड पुरवण्यासाठी आमदार दाजीने अधिका-यांवर दबाव वाढवला. त्यामुळेच २ कोटी १४ लाख रुपये एवढ्या खर्चाचे हे काम त्यांना देण्यात आले आहे.
यापूर्वी नऊ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. उर्वरीत नऊ शाळांसाठी नव्याने वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. त्यानुसार पिंपळे गुरव माध्यमिक विद्यालयात २६ कॅमेरे, आण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालय पिंपळे सौदागर येथे २३, माध्यमिक विद्यालय थेरगाव २१, माध्यमिक विद्यालय आकुर्डी २२, माध्यमिक विद्यालय केशवनगर चिंचवडगाव १२, माध्यमिक विद्यालय खराळवाडी पिंपरी १२, क्रिडा प्रबोधिनी माध्यमिक विद्यालय उद्यमनगर १५, राजीव गांधी माध्यमिक विद्यालय नेहरूनगर १६, दिनदयाळ उपाध्याय माध्यमिक विद्यालय संत तुकारामनगर १४ एवढे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. त्यासोबत ४९ एलईडी फुल टिव्ही, ३ केव्हीए यूपीएस, १६ टीबी एचडीडी, मॅनेजेबल स्वीचेस व इतर अनुषंगिक कामे करण्यात येणार आहेत. हे काम करण्यासाठी मे. फिनिक्स इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदार संस्थेला १२ मार्च रोजी कामाचे आदेश दिले आहेत. आदेशावर दूरसंचार विभागाचे कार्यकारी अभियंता थॉमस नरोन्हा यांची स्वाक्षरी आहे.