न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जुलै २०२१) :- ‘ ज्ञानोबा माऊली तुकाराम ‘ असा जयघोष व फुलांची उधळण करीत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा शनिवारी (दि. २४) रात्री सुमारास श्रीक्षेत्र देहूगावात दाखल झाला. रात्री बाराच्या सुमारास मंदिर प्रदक्षिणा घालून श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका मंदिराच्या भजनी मंडपात विसावल्या.
पहाटे पंढरपूर येथे पालखी मुक्कामी असताना पादुकांची महापूजा करण्यात आली. सकाळी ७ वाजता गोपाळपुरा येथे महाकाल्यासाठी श्री संत तुकाराम महाराज मठातून पादुका अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी डोक्यावर नेल्या गोपाळपुरा येथे बापूमहाराज देहूकर यांचे सकाळी ८ ते १० या वेळेत काल्याचे कीर्तन झाले. कीर्तनानंतर विठ्ठल मंदिरात पादुका भेटीसाठी आणण्यात आल्या. मंदिरात परंपरेप्रमाणे विठ्ठल रुक्मिणी व श्री संत तुकाराम महाराज पादुका भेटीचा कार्यक्रम पार पडला.
यानंतर महाराजांच्या पादुका पालखी मुक्कामी विसाव्यासाठी आल्या. येथे काल्याचा महाप्रसाद झाला. दुपारी २ वाजता श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका पाच दिवसांच्या मुक्कामानंतर देहूकडे परतीच्या प्रवासाला निघाल्या. या पादुका ९ तासांचा प्रवास करून देहूत दाखल झाल्या, तत्पूर्वी रात्री अकराच्या सुमारास चिंचोली येथे पादुका स्थानावर अभंग आरती झाली. रात्री सव्वाअकराव्या सुमारास श्रीक्षेत्र देहूगाव येथील प्रवेशद्वार कमानीत दाखल होताच, भाविकांनी ज्ञानोबा माऊली तुकाराम नामाचा जयघोष करीत पादुकांचे स्वागत केले.