- मनसे अध्यक्ष तथा नगरसेवक सचिन चिखलेंची घटनास्थळी भेट..
- तात्काळ उपाययोजना करण्याची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०२१) :- रुपीनगर येथून आकुर्डीच्या दिशेने जाताना निगडीमधील भक्ती शक्ती चौकात इसमाच्या (एम एच १४ / सी झेड ८०३७) दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या एका ट्रकने (जी जे २४ / एक्स २०८२) जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार इसम ट्रकखाली आला. त्यात त्या इसमाला गंभीर दुखापत झाली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अकबर अल्ली सिद्दीकी (वय ४५, रा. रुपीनगर) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. ही घटना आज (शुक्रवारी, दि. ३०) सकाळी घडली. घटनेची माहिती मिळताच निगडी पोलीस, वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या घटनेचा पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत. यावेळी मनसे अध्यक्ष व नगरसेवक सचिन चिखले यांनी घटनास्थळी भेट दिली.
ते म्हणाले, भक्ती-शक्ती चौकातील नव्या उड्डाणपुलावर मागील एक महिन्यापासून वाहतूक सुरु करण्यात आली. वाहतूक सुरु झाल्यापासून अपघातामुळे आत्तापर्यंत तीन जण मृत्युमुखी, सहा जण अपंग झालेले आहेत. अजूनही कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतो. या पुलावर तत्काळ वाहतूक पोलीस व पालिका अधिकारी यांनी पाहणी करून उपाययोजना कराव्यात. महत्वाच्या वळणावर व रोटरी पुलावर रर्मलर बसविण्यात यावे. योग्य त्या ठिकाणी दिशादर्शक लावण्यात यावेत. एकेरी वाहतूक करत असताना नागरिकांना कळावे यासाठी स्पष्ट फलक लावण्यात यावेत. ट्रान्सपोर्ट नगरीपासून येणाऱ्या रस्त्याजवळ स्पीड ब्रेकर लावून दिशादर्शक फलक लावण्यात यावे, अशी मागणी पालिका आयुक्तांकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.