- १ ऑगस्टपासून कामावरुन कमी केले जाणार; कामगारांचे आंदोलन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२१) :- यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) बीव्हीजी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (दि.२) आंदोलन केले. दोन दिवसांत कामावरुन कमी केले जाणार असून त्याजागी दुसऱ्या ठेकेदाराचे कामगार भरले जाणार असल्याने बीव्हीजीच्या सफाई कर्मचारी व मदतनीस असलेल्या कर्मचाऱ्यांनी वायसीएम रुग्णालयाच्या आवारात आंदोलन केले.
वायसीएम रुनालयात साफसफाई व मदतनीस म्हणून कर्मचारी पुरविण्याचा ठेका गेले १५ वर्षांपासून बीव्हीजी कंपनीकडे आहे. यामुळे गेल्या १५ वर्षांपासून येथे सुमारे दोनशे कर्मचारी काम करतात. मात्र, गुरुवारी अचानक त्यांना येत्या १ ऑगस्टपासून कामावरुन कमी केले जाणार असल्याचे सांगण्यात आले असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. रुग्णालयात कामाचा ठेका पण घ्या मात्र, आम्हाला कामावरुन कमी करु नका, अशी कर्मचाऱ्यांनी मागणी केली.
याबाबत कर्मचाऱ्यांनी सांगितले की, गेल्या १५ वर्षांपासून येथे आम्ही काम करतो. असे अचानक कामावरुन कमी केल्यावर आम्ही काय करायचे? कुटुंब कसे चालवायचे? कंपनीने आम्हाला पूर्वसूचना का दिली नाही? असा सवाल कामगारांनी उपस्थित केला. येथे काम करणाऱ्या कामगारांपैकी १० ते १५ कर्मचारी दिव्यांग आहेत. त्यांनी कुठे जायचे असा सवाल त्यांनी विचारला आहे.