- नागरिकांना चौक ओलांडणे ठरतेय धोकादायक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२१) :- चिंचवडगावात मुख्य प्रवेश ठिकाणी सहा रस्ते येऊन मिळतात. या ठिकाणी वाहनांची मोठी वर्दळ असते. चौकातच व्यापारी गाळे, बैंक कार्यालये, खासगी कार्यालये, दुकाने तसेच मंडई आहे. चौकात व पुढील रस्त्यावर पादचारी मार्ग नाहीत. त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना चौक ओलांडणे धोकादायक बनले आहे. कायम येथे अपघात घटना घडतात.
अर्बन स्ट्रीट डिझाइनमुळे दुपारच्या वेळेस तुलनात्मकदृष्ट्या कमी वाहने असतानादेखील कोंडी होत आहे. येथील उड्डाणपुलाचे काम करतेवेळी येथील वाहतुकीचा अभ्यास करण्यात आला होता. सहा रस्त्यांमुळे बनलेला चाफेकर चौक व पुणे शहरातील अलका चौक येथेदेखील सहा रस्ते येऊन मिळतात. तेथील अडचणी, वाहतूककोंडी व जोखीम एकसारखीच दिसून आली आहे. त्यामुळे दोन्हीकडील नियोजन सारखेच करावे लागेल.
चौकात वाहतूक नियंत्रण दिवे (सिग्नल पदधती) अस्तित्वात नाही. तसेच नियोजित अर्बन स्ट्रीटच्या डिझाइनच्या अंमलबजावणीनंतर रस्त्याचे वापरक्षेत्र कमी होणार आहे. हे हानिकारक आहे. त्यामुळे अर्बन स्ट्रीट डिझाइन वाहतुकीच्या दृष्टीने त्रासदायक व खर्चिक असून हे काम रद करण्यात यावे, अशी मागणी माजी नगरसेवक गोलांडे यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.