- कोरोनाच्या अनुषंगाने ट्रस्टचा निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑगस्ट २०२१) :- चिंचवड येथील महासाधू श्री मोरया गोसावी समाधी मंदिरातून दरवर्षी श्रावणामध्ये होणारी मंगलमूर्तीची द्वारयात्रा सलग दुसऱ्या वर्षीही रद्द करण्यात आली आहे. अद्यापही कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव असल्यामुळे सोमवारपासून होणारी द्वारयात्रा रद्द करण्यात आली असल्याची माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी दिली.
चिंचवड देवस्थानच्या वतीने परंपरेनुसार श्रावण महिन्यात द्वारयात्रा केली जाते. या वर्षी द्वारयात्रा ९ ते १२ ऑगस्ट या कालावधीमध्ये संपन्न होणार होती. परंतु, अजूनही कोरोनाचे प्रमाण असल्याने जिल्ह्यातील नियमांमध्ये शिथिलता दिलेली नाही. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार जमावबंदी तसेच इतर निर्बधांमुळे या वर्षी ही द्वारयात्रा होणार नाही. ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. भाविकांनी व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन ट्रस्टने केले आहे.
मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत फक्त पूजा व आरती, असे धार्मिक विधी पार पाडले गेले. पायी जाण्यास बंदी असल्यामुळे यात्रा रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी दिली.
















