- गृहसंकुलांसाठी मोठ्या आकाराची जलवाहिनी बसविण्याची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑगस्ट २०२१) :- पारीजातबन, सुदर्शनगर परिसरातील अनेक गृहसंकुलात सोसायटी आवारात बांधण्यात आलेल्या भुमिगत सिमेंटच्या टाकीत जलवाहिनीद्वारे पिण्याचे पाणी सोडण्यात येते. तेच पाणी विद्युत पंपाच्या माध्यमातून गृहसंकुलातील टाकीत सोडले जाते. तेथून गृहसंकुलातील रहिवासीयांना बंद नलिकेतून पाण्याचा पुरवठा होतो. काही गृहसंकुलाच्या तळमजल्यावर नळाची व्यवस्था केली असून अनेक रहिवासी तेथून कळशी, हंडा, बादलीत पाणी भरून पिण्यासाठी घरोघरी वापरतात.
गेल्या काही दिवसांपासून पिण्याचे पाणी करंगळीपेक्षा बारीक व गढूळ येत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिक व गरोदर स्त्रियांना तिसर्या व चौथ्या मजल्यावर पिण्याचे पाणी कसे घेवून जायचे हा प्रश्न उदभवत आहे. अनेकवेळेला विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे भुमिगत पाण्याच्या टाकीतून गृहसंकुलावरील पाण्याच्या टाकीत विद्युत पंपाद्वारे पाणी पोहचत नसल्यामुळे अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे.
गढूळ पिण्याच्या पाण्यामुळे साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पालिका आयुक्तांनी तातडीने महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला आदेश देवून गढूळ व कमी दाबाने पाणी का येत आहे, याची चौकशी करावी तसेच गृहसंकुलांसाठी मोठ्या आकाराची जलवाहिनी बसविण्यात यावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेचे व्ही.जे.एन.टी. सेलचे कार्याध्यक्ष गुलामअली भालदार यांनी ई-मेल द्वारे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
















