- पिंपरीत एकाला कोयत्याने मारहाण; तरून गंभीर जखमी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑगस्ट २०२१) :- निराधारनगर येथून पायी चालत जात असताना फिर्यादीचा मित्र याची आरोपींसोबत बाचाबाची सुरू होती. त्यातील एकाने फिर्यादी यांना शिवीगाळ करत ‘इथे काय करतो’ अशी विचारणा केली. फिर्यादी यांना शिवीगाळ करून मारहाण केली.
त्यावेळी फिर्यादी यांचा दुसरा मित्र याने फिर्यादी यांना आरोपींच्या तावडीतून सोडवून तिथून पळून जाण्यास सांगितले. फिर्यादी पळून जात असताना भाटनगर येथे आले असता आरोपींनी त्यांना धक्का देत खाली पाडले. ‘तुला माज आला आहे का, तू भाई बनतोस का, आज तुझा मर्डरच करतो’ असे म्हणत आरोपींनी कोयत्याने मारले. यात फिर्यादी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ‘हा भाई बनायला बघतोय, याची भाईगिरी काढून त्याला संपवून टाकू’ असे म्हणत पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भाटनगर, पिंपरी येथे ही घटना घडली.
पवन शाम मेवाते (वय १८, रा. निराधार नगर, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय रामा पवार उर्फ मद्री (वय २६), बाळा राजू कोळे (वय २५), आदित्य जाधव उर्फ लाला (वय २५), दीपक बनसोडे (वय ३०, सर्व रा. पत्राशेड लिंकरोड, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
















