- ४२९ कोटी ५६ लाखांच्या गैरव्यवहारास चेअरमन मूलंचदानीसह इतर २५ जणांवर ठपका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑगस्ट २०२१) :- पिंपरी येथील दि सेवा विकास बँकेतील कर्ज प्रकरणातील लेखापरीक्षण अहवालात अनियमितता आढळून आली आहे. बोगस कर्ज वाटपातून तब्बल ४२९ कोटी ५६ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी बँकेचे तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी अशा २५ जणांवर व इतर कर्जदारांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.
बँकेच्या ५० लाखांवरील कर्ज प्रकरणांची चाचणी लेखापरीक्षण सहनिबंधक राजेश जाधवर यांनी केली. तो लेखापरीक्षण अहवाल ६ ऑगस्ट २०२१ मध्ये सादर केला आहे. कर्जदारांची पात्रता नसताना, परतफेड क्षमता नसताना, त्याचप्रमाणे विक्री योग्य व निर्वेध तारण नसताना आणि तारण मूल्याकंन कमी असताना गैरप्रकाराने नियमबाह्य कर्ज मंजूर केले. लेखापरीक्षणात १२४ कर्ज प्रकरणांत कर्ज मंजुरीपूर्व आणि त्यानंतर ४२९ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. कर्जदार समूहाने मंजूर केलेल्या कर्ज प्रकरणातील ४७२ कोटी रुपयांच्या रोख रकमा काढल्या. ४३.३४ कोटी रुपये रोख भरणा केला, असे एकूण ५१५ कोटी रुपये रोख रकमांचा आर्थिक व्यवहार केल्याचेही निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणातील ३ गुन्हे पिंपरीत पोलिस ठाण्यात दाखल असून, उर्वरित प्रकरणी गुन्हे दाखल होण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली. याप्रकरणी सागर सूर्यवंशी आणि शीतल सूर्यवंशी (तेजवाणी), विनय, विवेक आणि दीप्ती आव्हाना, रोझरी ग्लोबल एज्युकेशन, धर्मेंद्र ब्रिजलाल सोनकर व सोनकर समूह यांसह इतर असे एकूण ३७ कर्जदार व समूह कर्जदारावर आरोप आहे. चेअरमन अमर मूलंचदानी संचालक मंडळातील १४ पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी टी. एन. लखानी यासह इतर अधिकारी यांच्यासह २५ जणांना गैरव्यवहारास जबाबदार धरण्यात आले आहे.
















