- स्थायीकडून २ महिन्यांची पुन्हा मुदतवाढ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑगस्ट २०२१) :- केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गृहप्रकल्पांची कामे सन २०२२ पर्यंत चालू राहणार आहेत. त्यासाठी नियुक्त केलेल्या क्रिसील रिस्क अँड इन्फ्रास्ट्रक्चर सोल्युशन्स लि. या सल्लागार संस्थेला पुन्हा २ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. त्यासाठी १० लाख २१ हजार ७८८ रुपये खर्च स्थायी समितीने मंजूर केला आहे.
पालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गृहप्रकल्पांचे काम संथ गतीने सुरू आहे. लॉटरी काढून नावे निश्चित झाली तरी, अद्याप लाभार्थ्यांना सदनिका मिळालेल्या नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक घरांच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच, सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावरील परवडणारी उपलब्ध घरे (पीपीपी) योजना चालू आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) व बेघरांसाठी घरे (एचडीएच) योजनेत गृहप्रकल्प उभारले जात आहेत. त्यासाठी क्रिसील रिस्क अँड इन्फ्रास्ट्रक्चर सोल्युशन्स कंपनी सल्लागार म्हणून काम करत आहे. केंद्र व राज्य शासनाचे अनुदान मिळवणे, पाठपुरावा करणे, उपयोगिता प्रमाणपत्रे सादर करणे, योजनेशी निगडीत शासनाशी पत्रव्यवहार करणे आदी कामे कंपनी करते.
नवीन संस्थेसाठी निविदा प्रक्रिया राबविली आहे. त्यास विलंब होणार असल्याने आणखी २ महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात स्थायी समितीने मान्यता दिली. त्यासाठी प्रति महिना ५ लाख १० हजार ८९४ खर्च आहे. दोन महिन्यांसाठी एकूण १० लाख २२ हजार खर्च असून, त्यास समितीने मान्यता दिली.
















