- चिंचवडच्या व्हाईट हाऊस लॉजमधील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२१) :- लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराचा प्रेयसीने गळा आवळून खून केल्याची घटना चिंचवड येथील व्हाईट हाऊस लॉज येथे घडली आहे. पैगंबर गुलाब मुजावर असे खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून तो विवाहित असल्याची माहिती आहे.
आरोपी प्रेयसीला पिंपरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुजावर हा ३५ वर्षांचा होता. याप्रकरणी २९ वर्षीय प्रेयसीला अटक करण्यात आली आहे. मयत व्यक्तीच्या पत्नीने याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुजावर आणि २९ वर्षीय तरुणी हे दोघे एकाच ठिकाणी काम करत होते. विवाह करण्यास मुजावरने नकार दिला. यावरूनच दोघांमध्ये खटके उडाले त्यांच्यात वाद झाले.
दरम्यान, प्रेयसीने मुजावरला चिंचवडमधील व्हाइट हाऊस लॉजवरील ३०७ क्रमांकाच्या रूममध्ये भेटण्यासाठी बोलावले. लग्नास नकार दिल्याचा रागातून प्रेयसीने ओढणीने त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर या तरुणीनेच मुजावर हा बेशुद्ध पडला आहे अशी माहिती तेथील कामगारांना दिली. तातडीने मुजावरला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.