- वाल्हेकरवाडीतील घटना; वकिलावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑगस्ट २०२१) :- वाल्हेकरवाडी येथील स्व-मालकीची सर्वे नंबर ८३ हिस्सा नंबर २/३/४/२ मधील तीन गुंठे मिळकत फिर्यादी यांना २००४ ते १६ ऑगस्ट २०२१ दरम्यान सहा लाख ७५ हजारांना खरेदीखत करून विकली. मात्र त्या जागेचा प्रत्यक्ष ताबा दिला नाही. फिर्यादी यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने ती मिळकत खोटे बनावट दस्तऐवज (खरेदीखत) बनवून दुसऱ्या व्यक्तीला विकली.
फिर्यादी यांना विकत दिलेल्या मिळकतीऐवजी दुसरीकडील मिळकत खरेदीखत करून देतो, असे आरोपीने अमिष दाखवले. आरोपीच्या मालकीची नसलेली मिळकत ही त्याचीच असल्याचे खोटे सांगून त्या मिळकतीची खोटी, बनावट ताबा पावती बनवली आणि फिर्यादी यांना दिली. त्या मिळकतीची खरेदी करण्यासाठी पेपर नोटीस करण्यासाठी स्वतःचे संमतीपत्र देऊन फिर्यादी यांची सहा लाख ७५ हजारांची फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
आशा मेहरबानसिंग नेगी (वय ४१, रा. पिंपरी) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अॅड. सुनील शंकर वाल्हेकर (वय ५२, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.