- गुरुवारी शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑगस्ट २०२१) :- महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या रावेत येथील जलउपसा केंद्रात देखभाल दुरुस्तीचे काम होणार असल्याने गुरुवारी शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
पवना नदीवर रावेत येथे एमआयडीसीचे जलउपसा केंद्र आहे. त्याची देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा बंद राहील.
तसेच शुक्रवारी शहरातील काही भागात कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. एमआयडीसीच्या वाहिनीवरील पिपरी, चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, फुगेवाडी, निगडी, सीएमई, दिघी, कॅन्टोन्मेंट, व्हीएसएनएल, ओएफडीआर या भागात अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे पाण्याचा साठा करून ठेवावा, असेआवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.