- पिंपरी-चिंचवड शहर विकास आघाडीची स्थापना
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जाने.) :- पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना स्वावलंबी जीवनाची शाश्वती व स्वाभिमान देण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर विकास आघाडीची स्थापना करण्यात आली. भोसरी एमआयडीसीतील भोर रबर प्रोडक्स येथे कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली व पिंपरी-चिंचवड आघाडीची स्थापना करण्यात आली. यावेळी विकास आघाडीचे अध्यक्ष म्हणून अभय सोपानराव भोर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
यावेळी अभय भोर, संभाजी बारणे, भाऊसाहेब आडगळे, बाळकृष्ण थोरात, विजय जाधव, नाना कांबळे, संतोष गायकवाड, उद्योजक कार्तिक गोवर्धन, उद्योजक राहुल भगत, ज्ञानेश्वर शिंदे, प्रकाश शेट्टी, माळवदकर, विशाल पठारे, इस्माईल नदाफ, चेतन साबळे, समीर साबळे, दिनेश जगताप, जगदीप महाले, प्रशांत भिलारे, प्रशांत पठारे तसेच शहरातील विविध सामाजिक संघटना व ज्येष्ठ कार्यकर्ते व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना भोर यांनी सांगितले की, एमआयडीसी परिसरात दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे. तसेच स्मार्ट सिटीच्या योजनेत ओल्ड सिटीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात कोणतीही स्मार्ट सिटी योजना राबविण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. केवळ शहराबाहेरील भागांवर लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे. शहरांमध्ये नऊ ते दहा लाख झोपडपट्टी परिसरातील नागरिक राहत आहेत.
महापालिकेचे शहरातील व्यावसायिक तसेच औद्योगिक परिसराकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शहरातील उद्योगसुद्धा दुसऱ्या ठिकाणी जात आहेत. येथील कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. त्यामुळे संघटनेच्या कार्यकारिणीची लवकरात लवकर निवड करून, प्रस्थापित सत्तेविरुद्ध मोठा जनलढा उभारणार असल्याचे, भोर यांनी सांगितले आहे.











