न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. १६ जाने.) :- महापालिकेच्या वतीने काळेवाडीमार्गे पवना नदी ते चिंचवड लिंकरोड व पुढे पुणे-मुंबई लोहमार्ग व महामार्ग यांना ओलांडून चिंचवड ऑटोक्लस्टर बाजूकडे एम्पायर इस्टेट येथे उड्डाणपूल उभारण्यात आलेला आहे. या उड्डाणपुलावरून चिंचवड लिंक रस्ता येथे उतरण्यासाठी व चढण्यासाठी रँप किंवा लूप बांधणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांकडून हरकती, सूचना मागविण्यात आलेल्या आहेत. महापालिकेने याबाबत जाहीर नोटीस जारी केली आहे.
चिंचवड येथील सर्व्हे क्रमांक २६४, २६६, २६५ येथील ४५ मीटर मंजूर विकास योजना रस्त्याच्या दोन्ही बाजूस चढणे आणि उतरण्यासाठी रँपसाठी महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम २०५ अंतर्गत १८ मीटर रूंदीचा महापालिका रस्ता घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रस्त्याचा आराखडा नागरिकांच्या अवलोकनार्थ महापालिकेच्या नगररचना व विकास विभागात उपलब्ध करण्यात आला आहे. याबाबत कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत किंवा सूचना असल्यास एक महिन्याच्या आत आवश्यक कागदपत्रांसह लेखी स्वरूपात करावी. या हरकती, सूचनांचा विचार करून रस्ता घोषित करण्यात येईल. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकती, सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे महापालिकेने या नोटीसीमार्फत स्पष्ट केले आहे.











