- कासारवाडीतील घटना; एकाला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपळे निलख येथील मुले व मुली शाळा क्रमांक ५२ या शाळेचा फसवणूक करण्याच्या उद्देशाने आरोपीने शाळा सोडल्याचा बनावट दाखला तयार केला. त्यावर शिक्के मारून खोटी सही करून दिली. गुरुवारी (दि. २८) कासारवाडी रेल्वे स्टेशनच्या मागे ही घटना घडली.
पोलिसांनी शाळेचे शिक्के, शाळेचे कोरे दाखले, ६०० रुपये रोख आणि एक हजारांचा मोबाईल फोन जप्त केला आहे. पोलीस शिपाई प्रभाकर खाडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी विरोधात भारतीय दंड विधान कलम ४६५, ४६६, ४६८, ४७३, ४७४, ४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल विश्वम्भर शिंदे (वय ४१, रा. आनंदनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.