- दुचाकी आणि फोन लंपास; डांगे चौकातील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑक्टोबर २०२१) :- डांगे चौकाकडे जाणा-या रस्त्यावर मंगळवारी (दि. २६) मध्यरात्री एक वाजता शेल पेट्रोल पंपाजवळ दोन अनोळखी व्यक्तींनी पोलीस असल्याचे भासवून ‘आमच्या गाडीला लाथ मारून आला का’ असे म्हणून फिर्यादीकडे लायसन्स मागितले.
मित्राला फोन करण्यासाठी फिर्यादीने मोबाईल बाहेर काढला. ‘पोलीस स्टेशनला गेल्यावर कोणाला फोन करायचा. आता आमच्यासोबत चल’ असे म्हणून फिर्यादीचा मोबाईल हिसकावून घेतला. तसेच फिर्यादीच्या दुचाकीवर आणखी एकाला मागे बसवून पोलीस ठाण्यात घेऊन जात असल्याचा बनाव रचला. रस्त्यात ‘आम्हाला तीन हजार रुपये दे. तुला सोडून देतो’ अशी पैशांची मागणी केली. पैसे नसल्याचे सांगितल्यावर आरोपींनी फिर्यादीला रस्त्यात उतरवले. चालत वाकड पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले.
पोलीस ठाण्यात येऊन दुचाकी आणि मोबाईल फोन घेऊन जा असे सांगून आरोपींनी फिर्यादीची ४० हजारांची दुचाकी आणि १५ हजारांचा मोबाईल फोनची चोरी केली आहे. मयूर अरुण सरडे (वय ३२, रा. लोहगाव, पुणे) यांनी गुरुवारी (दि. २८) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दोन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.