न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जाने.) :- पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटीकडे झेप घेत असून, अनेक नाविन्यपूर्ण विकासात्मक गोष्टींनी शहराच्या वैभवात भर घातली आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने अट्टाहासही केला जातो. परंतु, आरोग्याचा प्रश्न आला की, त्यात शेपूट घालून शहरातील जनतेला वाऱ्यावर सोडले जाते. आरोग्याच्या प्रश्नाकडे प्रशासन व सत्ताधाऱ्यांची अनास्था का? असा प्रश्न विचारत शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप चव्हाण यांनी आयुक्त हर्डीकर यांची नुकतीच भेट घेतली व त्यांना महानगरपालिकेचे भोसरी येथील १०० बेडचे रुग्णालय गोरगरीब नागरिकांसाठी खुले करण्याबाबत पत्र दिले आहे.
पत्रात त्यांनी म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून भोसरी येथे नवीन हॉस्पिटलचे काम सुरु आहे. शहराची लोकसंख्या आणि तुलनेने रोजगारासाठी येणा-यांची संख्या पाहता सर्व वैद्यकीय बोजा वाय. सी. एम. रूग्णालयावर येतो. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे डॉक्टरांची कमतरता भासते व रुग्णांची हेळसांड होते. त्यामुळेच महानगरपालिकेच्या वतीने भोसरी येथे या रुग्णालयाची निर्मिती केली खरी, परंतु, वेगवेगळ्या कारणास्तव ते धूळखात पडून आहे. वैद्यकीय विभाग शक्तीशाली बनविण्यासाठी हे रुग्णालय सुरु होणे गरजेचे आहे. भोसरीतील गरीबांसाठी हे रुग्णालय वरदानच ठरणार आहे.
तसेच प्रशासनाकडून हे रुग्णालय खाजगी तत्वावर देण्याबाबत महापालिकेच्या हालचाली चालू आहेत. त्यास शिवसेनाचा विरोध आहे हे आयुक्तांनी लक्षात घ्यावे व तात्काळ या रुग्णालयाचा सोपस्कार पार पाडून, भोसरी व परिसरातील नागरिकांकरीता हे रुग्णालय खुले करण्यात यावे, अन्यथा शिवसेना स्टाईल दाखवू, असे या पत्रात चव्हाण यांनी म्हटले आहे.











