- नगरसेवकांकडून सभेत आकाशचिन्ह परवाना विभाग टार्गेट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ डिसेंबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड शहरात अनेक वर्षांपासून अनधिकृत जाहिरात होर्डिंग लावण्यात येत आहेत. त्यावरील लाखो रुपयांचे उत्पन्न महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांच्या खिशात जात आहे. अनेक होर्डिंगमध्ये काही अधिकाऱ्यांची भागीदारी आहे, असे गंभीर आरोप करीत दोषींवर कारवाई करावी; तसेच बाह्य जाहिरात धोरण नव्याने सभागृहासमोर सादर करावे, असा सल्ला सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला दिला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या.
महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने नवे जाहिरात धोरण तयार केले आहे. तो प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याचा निर्णय सभेने घेतला. त्यावरून सभागृहात जोरदार चर्चा झाली.
मनसेचे गटनेते सचिन चिखले म्हणाले की, कोणत्याही दबावाला बळी न पडता आयुक्त अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करीत आहेत. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण थांबले आहे.
माजी महापौर राहुल जाधव म्हणाले की, आकाशचिन्ह परवाना विभागाचे अधिकारी उर्मटपणे वागतात. आयुक्तांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही. शहरातील अनधिकृत होर्डिंगवर तोंड बघून कारवाई केली जाते.
भाजपचे संदीप वाघेरे म्हणाले अनधिकृत होर्डिंग तोडल्याबद्दल संबंधित ठेकेदाराला पैसे दिले गेले. शहराला स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत.
भाजपचे संतोष लोंढे म्हणाले की, एक परवाना घेऊन दहा, दहा अनधिकृत उभे केले जातात. त्यामुळे दुर्घटना घडू शकते.
भाजपच्या सीमा सावळे म्हणाल्या की, आकाशचिन्ह विभागाच्या काही अधिकाऱ्यांची होर्डिंग उभारणीमध्ये भागीदारी आहे.
शहरात किती अनधिकृत होर्डिंग आहेत. त्यातून किती उत्पन्न मिळते, इतर उत्पन्न कोठे जाते याचा शोध घ्या. दोषींवर फौजदारी करा. होर्डिंगचालक, जागामालक या सर्वांना विश्वासात घेऊन सुधारित जाहिरात धोरण तयार करा, असा सल्ला राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे यांनी दिला.


















