- महापौरांकडून प्रकरणाच्या चौकशीचे आयुक्तांना आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ डिसेंबर २०२१) :- निविदेतील अटी व शर्ती शिथिल करून मर्जीतील संस्थेला मोकाट भटक्या श्वानांची नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचे काम देण्यात आले. त्यांनी कागदोपत्री ५ वर्षांत ७१ हजार ५१७ कुत्र्यांची नसबंदी करीत ६ कोटी २८ लाख ५४ हजारांचे बिल घेतले आहे. इतक्या मोठ्या संख्येने कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली नसून, ही महापालिकेची आर्थिक फसवणूक आहे, असा आरोप विरोधकांनी करीत त्या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी सभागृहात केली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या.
सभेत चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश बहल यांनी मोकाट श्वानांचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. बहल मागील सभेत तक्रार करूनही आयुक्तांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. वरील कामासाठी नेमलेल्या एजन्सीने बोगस कागदपत्रे सादर केली आहेत. दुसऱ्याच संस्थेचे पॅनकार्ड दिले आहे. त्याच्यासाठी निविदेतील अटीव शर्ती रद्द करण्यात आल्या आहेत.
केवळ कागदावर कुत्र्यांची नसबंदी दाखवून महापालिकेची कोट्यवधींची लूट करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई न केल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महापौरांनी आयुक्तांना दिले.


















