- माघ शुद्ध दशमी सोहळा कोरोनामुळे रद्द…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जानेवारी २०२२) :- संत तुकाराम महाराज यांचे चिंतनस्थळ असणाऱ्या श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे दरवर्षी होणारा माघ शुद्ध दशमी सोहळा ओमायक्रॉन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. दि. ५ ते १३ फेब्रुवारीला होणारा सोहळा साधेपणाने साजरा होणार आहे. दशमीला होणारा महाप्रसाद आणि जाहीर कार्यक्रम यंदा होणार नसल्याने मंदिर देवस्थानने कळविले आहे.
मावळ तालुक्यातील श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे दरवर्षी संत तुकाराम महाराज यांची जयंती अर्थात वसंत पंचमी ते माघ शुद्ध त्रयोदशीपर्यंत दशमी सोहळ्याचे आयोजन केले जाते. तसेच माघ शुद्ध दशमीला दोन ते तीन लाख वारकरी दर्शनासाठी येत असतात. भंडारा डोंगर ट्रस्ट माघ शुद्ध दशमी समितीच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह, प्रवचन, कीर्तन, गाथा भारूड, प्रवचनांचे आयोजन केले जाते.
याबाबत दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद म्हणाले, गेले दोन वर्षे ओमायक्रॉन आणि कोरोना महामारीचे संकट आपल्यावर आहे. भंडारा डोंगर दशमी समितीची बैठक झाली. जिल्हा प्रशासनाने कोरोना संदर्भात केलेल्या सूचनांसदर्भात माहिती देण्यात आली. तसेच कोरोना नियमांचे पालन करून उत्सव हा साधेपणाने साजरा करण्यावर एकमत झाले. तसेच वारकऱ्यांनी भंडारा डोंगरावर गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहेत. दर्शनासाठी मंदिर बंद राहणार आहे. त्यामुळे भंडारा डोंगरावरील दशमी सोहळा यंदा होणार नाही. नियमांचे पालन करून नैमित्तिक पूजा, विधी करण्यात येणार आहेत.















