- आयुक्तांच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेची मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जानेवारी २०२२) :- महापालिकेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुढील वर्षात मिळकत करात सलग दुसऱ्या वर्षी दरवाढ होणार नाही. आयुक्त राजेश पाटील यांच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या.
पिंपरी – चिंचवड महापालिकेने २० फेब्रुवारी २०२२ पूर्वी विविध करांचे दर निश्चित करणे आवश्यक आहे. त्यानुसार महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार कररचना ‘ जैसे थे ‘ ठेवली आहे. महापालिकेत सध्या पावणेसहा लाख घरे आहेत. त्यात व्यावसायिक, करयोग्य निवासी, संमिश्र मालमत्ता आहेत. त्यांना मागच्या वर्षांचे दरच यंदाही कायम ठेवले आहेत.
उपकरातही वाढ नाही. मिळकत करामध्ये विविध उपकर घेतले जातात. सफाई, अग्निशमन, शिक्षण, वृक्ष, मलप्रवाह सुविधा, पाणीपुरवठा लाभ कर, रस्ता कर आदी घेतले जातात. त्यातही कोणतीही वाढ केली नाही. सामान्य करातील सवलत आणि करमणूक करही वाढविला नाही. तसेच विविध उताऱ्यासाठी महापालिका शुल्क घेते. मालमत्ता उतारा, हस्तांतरण नोटीस, प्रशासकीय सेवा, थकबाकी नसल्याचा दाखला देणे यासाठी शुल्क आकारले जाते. आयुक्तांनी २०२२-२३ या वर्षामध्ये सामान्य कर आहे तसाच ठेवला आहे. आयुक्तांच्या प्रस्तावाला सभेने मान्यता दिली आहे.














