थेरगावातील गणेशनगरमधील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जानेवारी २०२२) :- तरूणाला मोबाईलवर कॉल करून शिवीगाळ केली आणि भेटण्यास बोलविले. त्यानुसार, तरूण मंगळवारी (दि. २५) रात्री साडेदहाच्या सुमारास गेला. तू मला शिव्या का दिल्या, मी या एरियाचा भाई आहे, माझ्या नादी कोणी लागले तर मी कोणाला सोडणार नाही, अशी धमकी आरोपीने दिली. तसेच फिर्यादी तरूणाला कमरेच्या बेल्टने मारहाण करत जमीनीवर टाकलेली बिस्किटे खाण्यास भाग पाडले. इतर आरोपींनीही तरूणाला शिवीगाळ करत मारहाण केली. यामध्ये फिर्यादी तरुण जखमी झाला.
थेरगाव येथील गणेशनगर येथे मंगळवारी (दि.२५) रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला होता. या प्रकरणातील ‘भाई’ दोन साथीदार आरोपींना अटक करून वाकड पोलिसांनी त्यांचे मुंडन करून रविवारी (दि. ३०) त्यांची गणेशनगर परिसरातून धिंड काढली.
अजित उर्फ आदित्य सुनील काटे (वय २०, रा. ताथवडे), प्रकाश भिवा इंगोले (वय २१, रा. काळाखडक, वाकड), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह गंग्या उर्फ रोहन वाघमारे (रा. थेरगाव), प्रशांत आठवले (रा. शिवकाॅलनी, गणेशनगर, थेरगाव), व तीन अल्पवयीन मुले यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यातील अल्पवयीन तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी २० वर्षीय तरूणाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.














