न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ फेब्रु .) :- सध्या शहरामध्ये पिंपरी चिंचवड महानगपालिकेचा विकास कामांचा धडाका सुरू आहे. शहरात विविध ठिकाणी उड्डाणपूल, अंतर्गत रस्ते, ग्रेड सेप्रेटर भूमिगत रस्ते, पूल, मेट्रो, बीआरटी प्रकल्प यांची कामे वेगाने सुरू आहेत.परंतु, सदरची कामे सुरू असताना सुरक्षेचे नियम ठेकेदार पायदळी तुडवत आहेत. त्यामूळे प्रवासी नागरिकांच्या सुरक्षेचे तीन तेरा वाजले आहेत.
अश्या निष्काळजीपणाचा फटका नुकताच प्राधिकरण आणि वाल्हेकरवाडीतील रहिवाशी प्रवास्यांना बसला. सध्या बिजलीनगर येथे ग्रेड सेपरेट कामाकरता खोदाईचे काम सुरू असून, काम करत असताना सुरक्षा हेतू पालिकेच्या नियमांचे तंतोतंत पालन सदस्थितीत होंत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दोनच दिवसांपूर्वी पोकलेन या अवजड वाहनांच्या असुरक्षित खोदाईमुळे शेजारील वापरात असणारा रस्ताच कोसळला. प्राधिकरणातून चिंचवडगावाकडे जाणारी पीएमपीएल बस खड्ड्यात कोसळण्यापासून थोडक्यात बचावली. बसमध्ये प्रवास्यांची संख्याही मोठी होती. बस आणि प्रवाशी यांच्या एकत्रित वजनामुळे सदरील रस्त्यावर कंपन निर्माण होऊन रस्त्याच्या कडेचा मोठा भराव कोसळला. मोठा आवाज झाल्यामुळे चौकात उपस्थित असलेले प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे सदस्य रवी हेळवर, संतोष चव्हाण, अमोल कानु, अमित डांगे, बाबासाहेब घाळी यांनी त्वरित धाव घेतली व त्यांनी समिती अध्यक्ष विजय पाटील यांना याबाबत कळविले. त्यानंतर तातडीने समिती सदस्यांनी लोखंडी बॅरिकेट्स लावून सदरील रस्ता वाहनांसाठी बंद केला आणि पुढील मोठा अनर्थ टाळला. या प्रसंगी समिती अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” प्राधिकरण, रावेत, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर परिसरातील नागरिकांनी या ठिकाणाहून प्रवास करताना अतिशय काळजीपूर्वक वाहन चालवावे. त्याचप्रमाणे दुचाकी धारकांनी तर हेल्मेट घालूनच प्रवास करावा. ठेकेदारांनी सदरचे काम करत असताना महापालिका सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे.”
असाच प्रकार शुक्रवार (दि. ०१) रोजी पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकात घडला. एका स्कूल व्हॅन चालकाचे खड्ड्यामुळे नियंत्रण सुटले. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडाला जाऊन सदरची व्हॅन धडकली. त्यामुळे सदरचा व्हॅन चालक गंभीर जखमी झाला. त्याला त्वरित उपचारासाठी समिती सदस्य व सामाजिक कार्यकर्ते अमरसिंग आदियाल यांनी इस्पितळात दाखल केले. तातडीच्या मदतीमुळे सदरील व्हॅन चालकाचे प्राण वाचले. व्हॅनमधील विद्यार्थ्याना सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही.
या संदर्भात अमरसिंग आदियाल म्हणाले, “सद्या पिंपळे गुरवमध्ये “खड्डेच खड्डे चोहीकडे” अशी अभूतपूर्व परस्थिती निर्माण झाली आहे. विकास कामांच्या नावाखाली रस्ता निर्मिती करताना सुरक्षा नियम ध्याब्यावर ठेवन्याचे काम सदरील ठेकेदार करीत आहेत. राजकीय पाठबळ असल्यामुळे सदरील ठेकेदार ना पालिका अधिकारयांचे ऐकत ना आयुक्त आदेशाचे पालन करत. या ठिकाणी नुकताच पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी विकास कामांची पाहणी केली व निर्देश दिले. परंतु, त्याचे पालन होताना मात्र दिसून येत नाही. पिंपळे गुरव मधील सर्वच रस्ते धोकादायक बनले आहेत. प्रवास्यांना जीव मुठीत ठेवून प्रवास करावा लागत आहे.”











