न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च २०२२) :- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पिंपरी चिंचवड, निगडी, बाणेर आणि हिंजवडी शाखेच्या वतीने संयुक्तिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा शतकवीर व आधारस्तंभ पुरस्कार वितरण सोहळा २७ फेब्रुवारी २०२२ रोजी पुस्तकांचे गाव, भिलार येथे संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये शिक्षणमहर्षी मनोहरपंत जांभेकर यांना ‘ आधारस्तंभ ‘ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. परंतु वयोमानामुळे जांभेकर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकले नाहीत .त्यामुळे दिनांक २२ मार्च रोजी मनोहरपंत जांभेकर यांचे निवासस्थानी मुक्ता दाभोलकर यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या वेळेस जांभेकर सरांनी महाराष्ट्र अंनिस चे समाज प्रबोधनाचे कामाचे महत्व अधोरेखित करताना शालेय मुलांच्या मधे वैज्ञानिक दृष्टींकोन, जिज्ञासा व प्रश्न विचारण्याची चिकित्सक वृत्ती वाढीस लागावी यासाठी शिक्षकांचे योगदान महत्वाचं व अधिक गरजेचं असल्याचे नमूद केले.
म अंनिसच्या विविध उपक्रम यादीमध्ये ग्रंथदिंडी या उपक्रमाचा समावेश झाल्याचे औचित्य साधून विश्वास पेंडसे यांनी ग्रंथदिंडीची माहिती दिली व त्यांचे अनुभव कथन केले. पिपंरी चिंचवड परिसरात वाचन संस्कृती अधिक रुजावी यासाठी ग्रंथदिंडी ऑन व्हील हा उपक्रम गेली आठ नऊ वर्ष त्यांनी यशस्वी रित्या चालवला. “असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास” या उक्ती प्रमाणे, डोक्यावर दूधची बाटली ठेऊन चालणे हा अवघड असा उपक्रम मिलिंद देशमुख यांनी २२ मार्च १९९३ केला होता. आजच्या कार्यकामात या विश्व विक्रमाच्या ३२ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने चित्रफीत दाखविण्यात आली. जिद्द, चिकाटी व प्रयत्तानांमधील सातत्य ठेवलं तर यश आपल्याच हातात आहे हा संदेश या उपक्रमातून आजच्या तरुणाईने घेण्यासारखा आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ राजेंद्र कांकरिया होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय सुर्वे यांनी सादर केले. सूत्रसंचालन अंजली इंगळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रदीप तासगांवकर यांनी केले. कार्यक्रमाला शुभांगी घनवट, अलका जाधव, ईला पवार,रामभाऊ नलावडे, सुभाष सोळंकी सर, चारूदत्त बुद्धीसागर, अशोक जाधव सर, सर्जेराव कचरे सर, श्रीनिवास गडकरी, रवीकर पाठक, हुरहिंद पठाण, इतर कार्यकर्ते आणि देशमुख कुटुंबीय उपस्थित होते.












