- १७ घंटागाडी कर्मचाऱ्यांना महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून नियुक्ती…
- पाचव्या वेतन आयोगानुसार वेतनफरकासह नियुक्तीला मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ५ नोव्हेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील घंटागाडी सेवेत ठेकेदारामार्फत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्याला अखेर यश आले आहे. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १७ कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या आस्थापनेवर सफाई कर्मचारी म्हणून नियुक्ती देण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या कर्मचाऱ्यांना १८ ऑगस्ट २००५ पासून पाचव्या वेतन आयोगानुसार वेतनातील फरकासह नियुक्तीचा लाभ मिळणार आहे. मात्र, या १७ कर्मचाऱ्यांपैकी दोघांचे निधन झाले आहे.
महापालिकेने २ सप्टेंबर १९९७ रोजी चार क्षेत्रीय कार्यालयांतर्गत घंटागाडी ठेकेदारांची नियुक्ती केली होती. त्यांच्यामार्फत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, कामावरून कमी करू नये आणि वेतनातील फरक मिळावा, या मागणीसाठी औद्योगिक न्यायालयात दाद मागण्यात आली होती.
औद्योगिक न्यायालयाने ३० जानेवारी २०२३ रोजी संबंधित कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत सामावून घेण्याचे आदेश दिले. या निर्णयाला महापालिकेने आव्हान दिले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयानेही महापालिकेची याचिका फेटाळल्याने कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय कायम राहिला. त्यानंतर महापालिकेच्या कर्मचारी निवड समितीची २२ मे २०२५ रोजी बैठक झाली. या बैठकीत संबंधित १७ कर्मचाऱ्यांना सफाई कर्मचारी पदावर नियुक्ती देण्यास तसेच पाचव्या वेतन आयोगानुसार १८ ऑगस्ट २००५ पासूनचा वेतनफरक देण्यास मान्यता देण्यात आली.
या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नुकतेच संबंधित कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू करून घेण्याचे आदेश दिले आहेत. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत कायमस्वरूपी स्थान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.














![[ब्रेकिंग न्यूज] लाचखोरीच्या आरोपानंतर मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे निलंबित!...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2026/11/Screenshot_20261104_200149_Google-190x122.jpg)



