न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० एप्रिल २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक ११ पूर्णनगर याठिकाणी महानगरपालिकेने भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान उभारले आहे. या उद्यानाचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे अनेक आरोप झाले आहेत. या सगळ्या बाबी आयुक्त राजेश पाटील यांच्या निदर्शनास देखील आणून दिल्या असल्याचे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे उपप्रदेश अध्यक्ष शांताराम खुडे यांनी म्हटले आहे.
या उद्यानाचे काम पूर्ण नसताना देखील राजकीय नेत्यांनी याचे श्रेय घेण्यासाठी उद्यानाचे उद्घाटन केले. हे उद्यान नागरिकांसाठी खुलेदेखील करण्यात आले असल्याचादेखील खुडे यांचा आरोप आहे.
ज्या-ज्या ठिकाणी या उद्यानात कामाचा दर्जा निकृष्ट झालेला आहे. ती कामे पूर्ण व्यवस्थित करून उर्वरित राहिलेले काम पूर्ण झाल्याशिवाय ठेकेदाराला उद्यानाच्या कामाचे बिल अदा करू नये. ठेकेदाराची चौकशी करून या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची देखील खातेनिहाय चौकशी करण्यात यावी. अधिकार्यांची चौकशी होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात यावे. काम पूर्ण झाल्याशिवाय ठेकेदाराला बिल अदा करू नये. या मागणीसाठी भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे उपप्रदेश अध्यक्ष शांताराम खुडे यांनी महानगरपालिके समोर आमरण उपोषण चालू केले आहे.


















