- दोन कोटींचा चेक स्वीकारताना आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; थेरगावातील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०२२) :- थेरगाव डांगे चौक येथे सिग्नेचर पार्क ही फिर्यादीची बांधकाम साईट सुरु आहे. या नवीन बांधकामाबाबत तक्रार करतो असे अरहाम आर ई कन्सल्टन्सी सर्विसेसचे आदिनाथ कुचनुर याने पत्राद्वारे कळविले. तसेच त्यात बांधकाम साईटच्या एकूण किमतीच्या २.५ टक्के म्हणजेच ९.२५ कोटी रुपये एवढी रक्कम देण्याची फिर्यादीकडे मागणी केली. याबाबत फिर्यादीने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे तक्रार केली.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी खंडणी विरोधी पथकाला या तक्रारीची शहनिशा करून कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी तपास केला असता त्यात आरोपीने यापूर्वी निवृत्त न्यायाधीशांची खोटी कागदपत्रे बनविणे, बांधकाम व्यावसायिकांना ब्लॅकमेल करणे, महापालिकेच्या अधिका-यांवर खोटे आरोप करणे, आर्कीटेक्ट यांना बदनाम करणे असे प्रकार केले असून अशा कारणांसाठी त्याच्यावर हिंजवडी, पिंपरी, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
त्यामुळे पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी डांगे चौक थेरगाव येथील सिग्नेचर पार्क या बांधकाम साईटवर सापळा लावला. सिग्नेचर पार्क साईटवरील ऑफिसमध्ये आरोपी आला. त्याने खंडणीच्या रकमेतील २५ टक्के २ कोटी रुपये रकमेचा चेक घेतला. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २ कोटी रुपयांचा चेक, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम विभागाशी निगडीत कागदपत्रे मिळून आली. त्यावरून आरोपी याने पिंपरी-चिंचवड, पुणे शहर, मुंबई येथील काही बांधकाम व्यावसायिकांना अशाच प्रकारे धमकावल्याचे दिसून येत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. २७) दुपारी थेरगाव येथे करण्यात आली. केतुल भागचंद सोनिगरा (वय ४१, रा. निगडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आदिनाथ भूजाबली कुचनुर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी कुचनुर याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.















