- १३९ जागेपैकी महिलांसाठी निघणार ७० चिट्ट्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) व सर्वसाधारण खुला गटातील (ओपन) जागेसाठी महिला आरक्षण सोडत मंगळवारी (दि. ३१) सकाळी अकराला चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात काढली जाणार आहे. त्याची संपूर्ण तयारी पालिकेच्या निवडणूक विभागाने पूर्ण केली आहे. त्यासंदर्भात ट्रायलही घेण्यात आली आहे.
अंतिम त्रिसदस्यीय ४६ प्रभाग प्रभागरचना १३ मे रोजी प्रसिद्ध करण्यात आली. आता आरक्षण सोडत मंगळवारी काढली जाणार आहे. पारदर्शक काचेच्या डॅममध्ये एका रंगाच्या चिठ्ठया टाकून विद्यार्थ्याच्या हस्ते चिठ्ठी काढली जाणार आहे. नागरिकांना सोडत व्यवस्थित दिसावी म्हणून प्रेक्षागृहात व बाहेर स्क्रिन लावण्यात येणार आहे. संपूर्ण सोडतीचे छायाचित्रिकरण केले जाणार आहे. पोलिस बंदोबस्तात पुरेशा प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाणार आहे, असे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.
सोडतीनंतर १ ते ६ जून असे सहा दिवस सोडतीसंदर्भात हरकती व सूचन स्वीकारण्यात येणार आहेत. हरकत व सुचनांचा विचार करून १३ जूनला प्रभागनिहाय आरक्षण अंतिम करून प्रसिद्ध केले जाईल.
प्रथम एससीच्या एकूण २२ जागांपैकी महिलांसाठी ११ जागांची सोडत काढली जाणार आहे. त्यानंतर एसटीच्या एकूण ३ जागांपैकी महिलांच्या २ जागांची सोडत निघेल. एससी व एसटीच्या एकूण २५ जागांच्या चिठ्ठया बाजूला ठेवल्या जातील. उर्वरित ११४ जागांतून सर्वसाधारण खुल्या गटातील महिलांच्या ५७ जागांची चिठ्ठी काढली जाईल. त्यासाठी प्रथम प्रभागातील ‘ अ ‘ जागेवरील चिठ्ठया काढल्या जातील. त्यानंतर ‘ ब ‘ जागेवरील चिठ्या निघतील. उर्वरित राहिलेल्या जागा या सर्वसाधारण खुला गटासाठी असतील. एका प्रभागात जास्तीत जास्त दोन महिलांच्या जागा आरक्षित असणार आहेत. एक प्रभागात सर्वच्या सर्व तीन महिला आरक्षण असणार नाही. एससीच्या २२ पैकी ११ जागा महिलांच्या आहेत. तर, एसटीच्या ३ पैकी २ जागा महिलांसाठी आहेत. सर्वसाधारण खुल्या गटासाठी एकूण ११४ जागा असून, त्यातील ५७ जागा महिलांकरीता आहेत. एकूण १३९ जागेतून महिला जागेसाठी ७० चिट्ट्या काढल्या जाणार आहेत.















