न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे २०२२) :- शहराची लोकसंख्या सध्या २५ लाखांवर जाऊन पोहचली आहे. नागरीकरणाचा वेगही झपाट्याने वाढतो आहे. त्यामुळे शहरातील हरितपट्टा कमी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून दरवर्षी झाडे लावण्याचे नियोजन करण्यात येते. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गतवर्षी महापालिकेने लावलेल्या १ लाख ३ हजार ८३८ झाडांपैकी सर्वाधिक ८० हजार झाडे लष्कराच्या हद्दीत लावली होती.
यंदा ३ लाख ४० हजार झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वाधिक झाडे देहूरोड येथील लष्करी हद्दीत लावण्यात येणार आहे. येथे दीड लाख झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दिघी-मॅग्झिन चौकाजवळ १ लाख रोपांची लागवड करण्यात येणार आहे. इंद्रायणीनगर येथील मोकळ्या जागेत २५ हजार झाडे लावण्यात येणार आहे. शहरातील उद्याने, सर्व रस्ते दुभाजक, रस्त्याच्या कडेने व महापालिका मिळकतींमध्ये ५० हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच, शहरातील सहकारी गृहरचना संस्थांमध्ये १५ हजार झाडे लावण्यात येणार आहे.
महापालिकेने यंदा शहरात ३ लाख ४० हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गतवर्षी १ लाख ३ हजार झाडे लावण्यात आली होती. त्या तुलनेत यंदा तिपटीपेक्षा अधिक झाडे लावण्यात येणार आहेत.
– गोरख गोसावी, सहाय्यक उद्यान अधिक्षक, महापालिका.


















