न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे २०२२) :- आंद्रा धरण योजनेत इंद्रायणीतून पाणी उचलण्यासाठी निघोजे, तळवडे येथील अशुद्ध जलउपसा केंद्र आणि चिखली जलशुद्धीकरण केंद्रांपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्याचे व विद्युत पुरवठ्याचे काम येत्या १५ दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर चिखली केंद्रास १०० एमएलडी पाणी उपलब्ध होईल. हे पाणी चिखली परिसरातील भागास पुरविले जाईल. निगडी केंद्रातून चिखली परिसरास पुरविले जाणारे पाणी इतर भागात वळविले जाईल, असे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी शुक्रवारी (दि.२७) सांगितले. त्यामुळे पावसाळ्यात शहराला अतिरिक्त पाणी मिळू शकणार आहे.
चिखली केंद्रास १०० एमएलडी पाणी मिळणार असे, वर्षभरापासून सांगितले जात आहे. त्यासाठी प्रशासन व पदाधिकारी यांनी वेगवेगळ्या तारखा घोषित केल्या; मात्र प्रत्यक्षात अद्याप शहराला पाणी मिळलेले नाही. या संदर्भात आयुक्तांना विचारले असता ते बोलत होते.
आयुक्त म्हणाले की, निघोजे अशुद्ध जलउपसा केंद्र आणि चिखली जलशुद्धीकरण केंद्राचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. दोन्ही केंद्रांना वीजपुरवठ्यासाठी भूमिगत वाहिनीटाकण्याचे काम सुरू आहे. तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात वीजजोड घेतला जाणार आहे. चिखली केंद्रास पाणी उपलब्ध झाल्यानंतर तांत्रिक चाचण्या घेतल्या जाणार आहेत. ते शुद्धीकरण प्रक्रिया नियमितपणे सुरू झाल्यानंतर चिखली परिसरातील भागात ते पाणी पुरविले जाणार आहेत. त्यानंतर निगडी सेक्टर क्रमांक २३ येथून चिखली भागास पुरविले जाणारे पाणी शहरातील इतर परिसरात वळविले जाणार आहे. त्यामुळे शहराला अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे.


















