- निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना; मतदारसंघाचा दौरा करण्याचेही आश्वासन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जुलै २०२२) :- आपल्यावरील कारवाई नजरचुकीने झाली आहे. त्याबाबत पक्षाने दिलगिरी व्यक्त केली आहे. पक्षासाठी व मतदारसंघासाठी आपण प्रामाणिकपणे काम केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण जोमाने कामाला लागावे. शिरूर मतदारसंघाचा मी लवकरच दौरा करणार आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर भेटीदरम्यान माजी खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांना सांगितले.
दोन दिवसांपूर्वी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे वृत्त आले होते. मात्र काही वेळातच नजरचुकीने हे घडल्याचे शिवसेना पक्षाच्यावतीने जाहीर करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर आढळराव पाटील यांनी मंगळवारी ठाकरे यांची भेट घेतली.
शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व जिल्हाप्रमुख शरद सोनवणे यांनी मुंबई येथे मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी खासदार संजय राऊत, राहुल शेवाळे, अरविंद सावंत, शिवसेनेचे सचिव अनिल देसाई, माजीमंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते, आदेश बांदेकर आदी उपस्थित होते.
आढळराव पाटील यांनी झालेल्या प्रकाराबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तोडून इथून पुढे सर्व निवडणुका स्वबळावर लढा, असा आग्रह धरला आहे.