- अंतिम मतदार यादी वेळेत होण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०२२) :- जिल्हा प्रशासनाकडून पिंपरी चिंचवड महापालिकेला सुपूर्द केलेल्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने मतदारांचे अर्धवट पत्त्यांमुळे मतदार यादीची प्रभागनिहाय विभागणी करताना अडचणी येत आहेत. या त्रुटी दूर करण्यासाठी कर्मचाऱ्यांना जागेवर जाऊन शहानिशा करावी लागत आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ४६ प्रभाग निहाय प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत. याद्यांवर हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. यामध्ये ८ हजार ७०० इतक्या हरकती आणि सूचना दाखल झाल्या आहेत. या हरकती आणि सूचनांच्या बाबतीत जागेवर जाऊन महापालिका कर्मचाऱ्यांकडून पडताळणी केली जात आहे. प्रारूप मतदार याद्यांमध्ये मतदारांच्या पत्त्यात केवळ परिसराचे नाव आहे. त्यामुळे त्या परिसरातील कोणत्या प्रभागात मतदाराचे नाव समावेश करायचा, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे शेजारच्या प्रभागातील नावे इतर प्रभागांत गेली आहेत. अशाच प्रकारच्या त्रुटींवर मोठ्या प्रमाणात हरकती व सूचना आल्या आहेत.
या हरकतीसूचना घेणाऱ्यांमध्ये माजी नगरसेवक, इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जाग्यावर जाऊन मतदार याद्यांमधील त्रुटींची शहानिशा कशी करायची, अपुऱ्या पत्त्यावरील मतदार शोधायचा कसा, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना सतावत आहे. दरम्यान अंतिम मतदार यादी ९ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार होती. परंतु महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त हरकती या पिंपरीत आल्या आहेत. त्यामुळे हरकती आणि सूचनांची संख्या लक्षात घेता हरकतींची पडताळणी वेळेत होऊ शकणार नाही, त्यामुळे अंतिम मतदार यादी १६ जुलै रोजी जाहीर करण्यास निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे.