न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०२२) :- १५ जुलैपासून १८ वर्षावरील सर्वांना सरकारी लसीकरण केंद्रावर मोफत करोना लसीचा बूस्टर डोस मिळणार आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली. सध्या देशभरात करोना लसीकरणाच्या मोहिमेत केवळ पहिला आणि दुसरा डोसच सर्वांना मोफत देण्यात येतोय. बुस्टर डोस केवळ ६० वर्षांवरील वयोवृद्ध व आरोग्य कर्मचाऱ्यांनाच मोफत आहे. इतर नागरिकांना खासगी लसीकरण केंद्रावर शुल्क भरून बुस्टर डोस घ्यावा लागत आहे.
करोना विषाणूंच्या नवनव्या व्हेरिएंटचा धोका पाहता वैद्यकीय तज्ज्ञ बुस्टर डोसचा सल्ला देत आहेत. मात्र, बुस्टर डोस घेण्याचं प्रमाण कमी आहे. अशास्थितीत केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याने देशातील बुस्टर डोस मोहिमेला गती मिळणार आहे. विशेष म्हणजे १८-५९ वयोगटातील नागरिकांनाही सरकारी लसीकरण केंद्रावर मोफत बुस्टर डोस मिळणार असल्याने बुस्टर डोस घेणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होईल.
दरम्यान, केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने ६ जुलै २०२२ रोजी करोना लसीचा दुसरा डोस आणि बुस्टर डोस यांच्यामधील कालावधीत कपात केली आहे. आधी दुसऱ्या डोसनंतर बुस्टर डोससाठी ९ महिने किंवा ३९ आठवडे थांबावं लागत होतं. मात्र, या नव्या निर्णयानुसार दुसऱ्या डोसनंतर ६ महिन्यात किंवा २६ आठवड्यात लसीचा बुस्टर डोस घेता येणार आहे. केंद्र सरकारची सल्लागार समिती नॅशनल टेक्निकल अॅडव्हायजरी ग्रुप ऑफ इम्युनायझेशनने (NTAGI) केलेल्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.