न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जुलै २०२२) :- पिंपरीतील नेपाळी मार्केटमध्ये पुणे महामेट्रोने १०० गाळे बांधून दिले आहेत. हे गाळे महापालिकेच्या भूमि व जिंदगी विभागाकडे हस्तांरित झाले. हे गाळे फेरीवाल्यांना वितरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती भूमि व जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी यांनी दिली.
मेट्रोच्या कामामुळे विस्थापित झालेल्या पिंपरीतील नेपाळी मार्केटमधील फेरीवाल्यांसाठी मेट्रोने १०० गाळे बांधून दिले आहेत. १०० पात्र फेरीवाल्यांची यादी प्रभागाने भूमि व जिंदगी विभागाकडे दिली आहे. त्यानुसार पात्र फेरीवाल्यांना पाच वर्षांसाठी भूईभाडे, हॉकर्स फी म्हणून जीएसटीसह ८८ हजार ७७५ रूपये भरण्यास महापालिकेने सांगितले आहे.
या गाळेधारकांबरोबर वर्षांचा करार करण्यात येणार आहे. ६५ फेरीवाल्यांनी ह प्रभागात २८ हजार ७७५ रूपयांचा पहिला हप्ता भरला आहे. या फेरीवाल्यांकडे प्रत्येकी २० हजार रूपयांचे तीन हप्ते आणखी बाकी आहेत. करोना महामारीमुळे आर्थिक अडचण असल्याचे कारण सांगून ३५ फेरीवाल्यांनी अद्याप पहिला हप्ता भरला नाही. या फेरीवाल्यांना पैसे भरण्याच्या सूचना महापालिकेने केल्या आहेत. तसेच या फेरीवाल्यांनी पैसे न भरल्यास इतर फेरीवाल्यांचा विचार महापालिका करणार आहे.
नेपाळी मार्केटमधील गाळे देण्यासाठी १०० फेरीवाल्यांची नावे निश्चित केली आहे. यामधील ६५ जणांनी पहिला हप्ता भरला आहे. या गाळ्यांसाठी भाडे अद्याप निश्चित झाले नाही. सध्या गाळ्यांवर क्रमांक टाकण्याचे काम सुरू आहे. जुलैअखेर फेरीवाल्यांना गाळे वितरित करण्यात येणार आहेत.
– प्रशांत जोशी, सहाय्यक आयुक्त…














