न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जुलै २०२२) :- भक्ती – शक्ती चौक निगडी ते खंडोबा माळ, महावीर चौक, अहिंसा चौक या मार्गावरून खाजगी ट्रॅव्हल्सला वाहतुकीसाठी बंदी करण्यात आली आहे. त्यासाठी पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. पिंपरी – चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे यांनी याबाबत आदेश दिले आहेत.
आदेशात म्हटले आहे, खाजगी ट्रॅव्हल्स बसेस निगडी भक्ती शक्ती चौक येथून महावीर चौक, अहिंसा चौक, रिव्हर व्ह्यू मार्गे जातात. दरम्यान महावीर चौक ते अहिंसा चौक या मार्गावर या ट्रॅव्हल्स थांबतात. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
त्यामुळे निगडी भक्ती – शक्ती चौक येथून खंडोबा माळ चौक मार्गे एसकेएफ कंपनी समोरून, कामिनी हॉटेलसमोरून अहिंसा चौक मार्गे ट्रॅव्हल्स बसेसना जाण्यास बंदी केली आहे. त्याऐवजी या ट्रॅव्हल्स बसेस निगडी भक्ती शक्ती चौक येथून काचघर, भेळचौक, संभाजी चौक, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, रिव्हर व्ह्यू या पर्यायी मार्गाने जातील, असे आदेशात म्हटले आहे.














