- मात्र, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्याचा पालिकेचा दावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जुलै २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठीची अंतिम मतदारयादी गुरुवारी (दि. २१) प्रसिद्ध केली जाणार होती. मात्र, सायंकाळी सात वाजेपर्यंत ती प्रसिद्ध झाली नव्हती. ‘इंटरनेटच्या तांत्रिक अडचणीमुळे मतदारयादी अपलोड करता आलेली नाही. त्याबाबतचे काम सुरू आहे,’ असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले होते. मतदार यादी पाहण्यासाठी महापालिका व क्षेत्रीय कार्यालयांत गेलेल्या नागरिक, कार्यकर्ते व इच्छुकांचा हिरमोड झाला होता.
दरम्यान राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्थळ पाहणी, पंचनामे पूर्ण करून अंतिम मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे, असा दावा महापालिकेने केला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने एकूण १४,८८,१२९ इतक्या मतदारांची संख्या आहे. प्रारूप मतदार यादीवर आलेल्या सुमारे साडे आठ हजारांवर हरकतींच्या अनुषंगाने सुमारे ८४००० मतदारांच्या प्रभागांमध्ये बदल करण्यात आला आहे.
आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, प्रशांत जोशी, नगर रचना सहसंचालक प्रशांत शिंपी, सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड तसेच २६० प्रगणक, ७० पर्यवेक्षक, ३५ नियंत्रित अधिकारी, ४५० बीएलओ या कामकाजासाठी महिनाभर काम करत होते, अशी माहिती पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिली आहे.