न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०२२) :- देहूरोड आणि राज्यातील अन्य सहा कॅंटोन्मेंट बोर्ड महापालिका व नगरपालिकांमध्ये विलीनीकरणाचा अहवाल सादर करावा, असे पत्र नगर विकास विभागाचे कार्यासन अधिकारी बागवान यांनी कॅंटोन्मेंट बोर्ड प्रशासनाला दिले आहेत.
देशभरातील ६२ कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करून ते महापालिका व नगरपालिकांमध्ये विलीनीकरण करण्याबाबत केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाने सर्व राज्य सरकारांना आदेश देत अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.
याबाबत देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे कार्यालयीन अधीक्षक राजन सावंत म्हणाले, ‘‘नगर विकास खात्याने अहवाल मागितला असून तसे पत्र बोर्डास प्राप्त झाले आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही होईल. राज्यातील देवळाली, अहमदनगर, औरंगाबाद, देहूरोड, कामठी, खडकी, पुणे हे सात कॅन्टोन्मेंट बोर्ड संबंधित महापालिका व नगरपालिकेमध्ये विलीनीकरण करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे सूचित करण्यात आले आहे. संबंधित बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रस्ताव सादर करण्याबाबत लिखित स्वरूपात कळविले आहे.














