न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जुलै २०२२) :- लोणावळा येथील तुंगार्ली परिसरातील क्रिसेंट बंगला मोहमद साजीद खान आणि त्यांच्या नातेवाईकांनी भाडेतत्वावर घेतला होता. वर्षाविहारासाठी ते लोणावळ्यात आले होते. गुरूवारी (दि. २८) रात्री साडेआठच्या सुमारास जलतरण तलावात पोहण्यासाठी उतरले. त्यांच्या बरोबरचा १३ वर्षीय शाळकरी मुलगा पोहून झाल्यानंतर तो जलतरण तलावातून बाहेर पडला. तेथे लावलेल्या एका दिव्याला त्याचा चुकून स्पर्श झाला.
काही कळायच्या आता तो कोसळला आणि तो बेशुद्ध पडला. त्याला वीजेचा धक्का बसल्याचे लक्षात आल्यानंतर इतरांनी त्वरीत या घटनेची माहिती लोणावळा शहर पोलिसांना दिली. हरुन मसूद वली (वय १३, रा. भायखळा, मुंबई) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. हरुनला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणी लोणावळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.नेमकी दुर्घटना कशी घडली, याची माहिती पोलिसांकडून घेण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.