न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०२२) :- रावेत पोलीस स्टेशनमध्ये बिट मार्शल ड्युटीवर होते. दरम्यान त्यांना पुनावळे येथून एक कॉल आला. व्यक्ती दारू पिऊन ऑफिसमध्ये शिरून मारहाण करत आहे. त्यानुसार पोलिसांनी पुनावळे येथे घटनास्थळी धाव घेतली. आरोपी हा त्याला कामावरून काढून टाकल्याच्या कारणावरून मालकाला मारहाण करत होता. पोलिसांनी त्याला अडवून पोलीस ठाण्यात आणले. त्यावर माझा बाप पोलीस आहे. माझ्या मोठमोठ्या ओळखी आहेत. तुमची नोकरी घालवतो, असे म्हणून पोलिसांना शिवीगाळ केली.
हॉस्पिटलमध्ये मेडिकलसाठी नेले असता त्याने तिथेही डॉक्टरांशी हुज्जत घालून मेडिकल करण्यास नकार दिला. त्यांनतर त्याला रावेत पोलीस ठाण्यात आणले असता त्याने पोलीस ठाण्यात दंगा करून सीसीटीएनएस रूममधील मॉनिटर उचलून पोलिसांना मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर आरोपीने एका पोलीस कर्मचा-याची वर्दी फाडून शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
पोलीस नाईक फैयाज अब्दुलरशिद मुल्ला यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विजय तुळशीदास शिरसट (वय 32, रा. चिंचवडगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.