- ६ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य मुलांचे पालिकेकडून सर्वेक्षण…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०२२) :- महापालिका शिक्षण विभागाकडून राबविण्यात आलेल्या मिशन “झिरो ड्रॉप आऊट” अभियानात शहरातील विविध भागात १५५ मुले शाळाबाह्य आढळून आली आहेत. यामध्ये ६ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यात आला. या मुलांना प्राथमिक शाळेत दाखल करून घेतले जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील एसटी स्टॅण्ड, वस्त्या, रेल्वे स्थानक, इमारत बांधकाम प्रकल्प, विविध चौक, बसथांबे आदी ठिकाणी शाळाबाह्य मुलांचा शोध सर्वेक्षणामध्ये घेतला आहे. शहरातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी सहभागी व्हायचे आहे. त्यासाठी शाळा स्तरावर मुख्याध्यापकांनी समिती स्थापन केली होती. या समितीमार्फत शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या सर्वेक्षणात विद्यार्थ्यांचे नाव, पालकांचे नाव, वयोगट, कोणत्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांचे शिक्षण झाले आहे अथवा शिक्षणच झालेले नाही, या बाबींची पडताळणी केली. हे सर्वेक्षण २४ हजार कुटूंबाचे करण्यात आले.
भोसरी, मोशी, पुनावळे, रावेत, काळा खडक या भागात केलेल्या सर्वेक्षणात ७४ मुले, ८१ मुली अशी एकूण १५५ मुले शाळाबाह्य आढळून आली आहेत. या मुलांचे, त्यांच्या पालकांचे प्रबोधन करुन मुलांना शाळेत दाखल करुन घेण्याची कार्यवाही केली जाणार आहे. महापालिका शिक्षण विभागाच्या विषयतज्ज्ञांनी यांचे नियोजन केले होते. यापूर्वी डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात ६ ते १० वयोगटातील एकूण १ हजार २३ मुले आढळली. तर ११ ते १४ वयोगटातील ८४ मुले आढळली होती.