न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ ऑगस्ट २०२२) :- पिंपरी चिंचवड येथील लिंकरोड माणिक कॉलनी परिसरात भटक्या पाळीव श्वानांना समाजकंटकांनी जेवणातून विष दिले असून, त्यांची हत्या करण्याचा प्रकार घडत असल्याचा दावा प्राणीप्रेमींकडून केला जात आहे. तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
नुकतीच प्रसूती झालेल्या श्वानाला शुक्रवारी (दि. २९ जुलै) कोणीतरी विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला. त्यात तिच्या पिल्लांनी दूध पिल्याने आई व तीन पिल्लांचा दुर्देवी मृत्यू झाला. परंतु गॅस्ट्रोची साथ असल्याने तोंडातून त्यांच्या फेस येत मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. परंतु, दुसऱ्या दिवशी पुन्हा मोती नावाच्या श्वानाला विष देण्यात आले. त्यावेळी प्राणीप्रेमी नवीन हेगडे, प्रसाद भूमकर, नकुल भोईर, तुषार आढारी आदींनी त्या श्वानाला खासगी दवाखान्यात नेले. त्यावेळी श्वानाचा अतिप्रमाणात विष घेतल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले.
त्या श्वानाचा सोमवारी (दि. १) सकाळी मृत्यू झाला. या प्रकरणातील अज्ञातांवर गुन्हा दाखल करून तपास करण्याची विनंती करण्यात येणार आहे. असे प्रकार पिंपरी – चिंचवड शहरात पुन्हा घडू नयेत, यासाठी सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही तपासण्यात येतील. तसेच मेडिकल व्यावसायिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विष देऊ नये, असे प्राणीमित्र नकुल भोईर यांनी सांगितले.