न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ ऑगस्ट २०२२) :- महापालिकेची सर्व रुग्णालये आणि दवाखान्यात वैद्यकीय शासन दरानुसार सुविधांसाठी वाढीव दर आकारणी सोमवारपासून (दि. १) सुरू झाली. केशरी शिधापत्रिकाधारक रुग्णांचे मोफत उपचार बंद झाले आहेत. नवीन दरवाढीबाबत अनेकजण अनभिज्ञ होते. रुग्णालयात गोंधळ उडाल्याची स्थिती होती. नवीन दरवाढीमुळे काही उपचार महाग झाले आहेत, तर काही उपचार स्वस्त झाल्याची स्थिती आहे.
वायसीएम रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यापूर्वी काही रक्कम भरावी लागते. केशरी शिधापत्रिकाधारकांना योजनांचा लाभ मिळत होता. त्यामुळे होते. पूर्वीच्या तुलनेत आता जादा पैसे भरावे लागत आहेत. काहींनी पैसे भरले नाहीत. परिणामी काही रुग्णांच्या नियोजित शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. रुग्णांबरोबरच प्रशासनातही गोंधळ असल्याची स्थिती होती. जे रुग्ण १ ऑगस्टपूर्वी दाखल आहेत, त्यांना कोणते दर लावावेत? तसेच ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची तारीख दिली आहे त्यांचे काय करायचे? याबाबत रुग्णालय प्रशासनात गोंधळ असल्याचेही दिसून आले. या सगळ्याचा त्रास रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आणि डॉक्टरांना झाला आहे.
नवीन केसपेपर फी पूर्वी १० रुपये होती. ७ दिवसांसाठी २० रुपये, जुना केसपेपर फी पूर्वी १० रुपये होती आता २० रुपये, औषधांकरिता ५ दिवसांसाठी १० रुपये होते. आता एक रुपयाही नसणार आहे. आंतररुग्ण शुल्क ३० रुपये कायम ठेवले. बेड चार्जेस जनरल वॉर्डासाठी पूर्वीप्रमाणेच दिवसाला ३० रुपये ठेवले. अतिदक्षता विभाग (आयसीयू) पूर्वी प्रतिदिन १७० रुपये होते. आता प्रतिदिन ४०० रुपये, साईड रुमसाठी प्रतिदिन ९० रुपये होते. आता प्रतिदिन १५० रुपये असणार आहेत. सेमी प्रायव्हेटसाठी पूर्वी प्रतिदिन ९० रुपये होते. आता ३०० रुपये असणार आहेत. ड्रेसिंगसाठी पूर्वी १० रुपये चार्जेस होते. आता २० रुपये असणार, प्लास्टर फी पूर्वी ९० रुपये होती. आता ५५ रुपये असणार आहे.
शासन दराप्रमाणे महापालिकेच्या सर्व रुग्णालयांत आजपासून दर आकारणी सुरू झाली आहे. नवीन दरामुळे कोणत्याही रुग्णालयात वादावादीचे प्रकार घडले नाहीत. नागरिकांनी सहकार्य केले.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी…