न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रु.) :- पीएमपीएमएल बस कंडक्टरने एका मजबूर व असहाय अंध विद्यार्थ्याचा फायदा घेत त्याच्या कानशिलात लगावून, त्याला शिवीगाळ केली आहे. हा प्रकार घडला तो केवळ सुट्या पैशांवरून.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून हा प्रकार थोडक्यात घडला असा, पांडुरंग रामचंद्र खरसळे (रा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) हा विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षण घेतो. काही कामानिमित्त त्याने पुणे विद्यापीठ येथून हडपसर ते चिंचवडगाव (बस क्रमांक २०४/१६) जाणारी बस पकडली.
ब्रेमेन चौकात बस आली असता, आरोपी कंडक्टरने पांडुरंग यांच्याकडे तिकीट मागितले. पांडुरंग याचा पास घरी राहिल्याने त्याने दोन हजार रुपयांची नोट तिकिटासाठी दिली. कंडक्टरने सुट्ट्या पैशांची मागणी केली. सुट्टे पैसे नसल्याचे पांडुरंग यांनी सांगितले असता कंडक्टरने चिडून ‘तुम्हा आंधळ्या लोकांचे नेहमीचे नाटकं आहे’ असे म्हणत पांडुरंग यास शिवीगाळ केली आणि कानशिलात लगावली.
याबाबत भेकराई डेपोचा बस कंडक्टर प्रमोद मालुसरे याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.