न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रु.) :- पुणे पोलीस आयुक्तालयाचे विभाजन होऊन स्वतंत्र पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय स्थापन झाले आहे. तरी शहरातील काही सीसीटीव्ही कॅमे-यांचे नियंत्रण पुणे पोलिसांकडे देखील आहे. त्यामुळे शहरातील दैनंदिन रुटीन तपास पुणे पोलीस करीत असतात. अशाच रुटीन तपासात पुणे पोलिसांनी धक्कादायक परिस्थितीचे चित्रण पहिले आहे.
पुणे शहर पोलिसांकडून पिंपरी चिंचवड हद्दीतील हिंजवडी परिसराचा सीसीटीव्ही फटेज तपासला असता, त्यांना काही अज्ञात दोन तरुण स्प्लेंडर दुचाकीवरून पाकिस्तानचा झेंडा घेऊन जातानाचे दृश्य कैद दिसले आहे. ही घटना शनिवार (दि. १६) रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडली आहे.
पुणे पोलिसांनी पिंपरी-चिंचवड नियंत्रण कक्षाला याबाबत तात्काळ माहिती दिली. पिंपरी-चिंचवड नियंत्रण कक्षाला याबाबात माहिती मिळताच त्यांनी हिंजवडी, वाकड आणि सांगवी परिसरात अलर्ट जारी केला. सर्व परिसराची पाहणी केल्यानंतर देखील पोलिसांच्या हाती शनिवारी रात्री पर्यंत काही लागले नव्हते. देशात अतिरेक्यांनी थैमान घातले असताना, शहरात अशी अनुचित घटना घडू नये, यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड पोलिसांनी या तरुणांचा कसून तपास सुरु केला आहे.